Ad will apear here
Next
बायडिंग हवं की पेपरवेट?


जग प्रगत झालं, आधुनिक झालं, विकास होतोय असं अनेक जण म्हणतात. म्हणोत बापडं; पण ‘स्वस्थचित्त’ असणं वेगानं नामशेष होत चाललंय! हे खोटं आहे का?

माणसांचं स्वस्थचित्त नसण्याचं प्रमाण फार वाढत चाललंय. ज्याला बघावं तो माणूस कसल्या ना कसल्या विवंचनेतच. कुणाकडे काम नाही म्हणून विवंचना, कुणाकडे काम आहे पण त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत म्हणून विवंचना. कुणाकडे पैसे भरपूर आहेत पण कौटुंबिक विसंवाद म्हणून विवंचना. ‘जगीं सर्व सुखीं असा कोण आहे, विचारीं मनां तूचिं शोधूनिं पाहें’ असं समर्थांनी म्हटलंय. या वचनाला कुणी अपवाद आहे का म्हणून शोधून पाहण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. 

आम्ही एक सर्व्हे करून पाहायचं ठरवलं. लोकांना एकच प्रश्न विचारायचा असं ठरवलं. ‘तुम्ही स्वस्थचित्त आहात का?’ हा तो प्रश्न. आम्ही जवळपास सहाशे लोकांना विचारून पाहिलं; पण एक जणसुद्धा हो म्हणेना. 

‘तू जे ‘स्वस्थचित्त’ म्हणतोस, तसा मी पूर्वी होतो. आता नाही,’ असं उत्तर मात्र अनेकांकडून मिळालं. ‘पूर्वी होतात, पण आता नाही, असं का म्हणता? सगळं तर आहे की तुमच्याकडं. मग आता स्वस्थचित्त नसायला काय झालंय?’ असं या माणसांना विचारलं. त्यावर जी उत्तरं मिळाली, ती फार गंभीर आणि काळजीत टाकणारी आहेत, असं मला वाटलं. 

त्यात माझ्यापेक्षा वयानं जवळपास बारा वर्षांनी मोठा असणारा माझा एक मित्र आहे. त्याला विचारलं. त्यानं तेच उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘सगळ्यांना वाटतं, माझ्याकडं सगळं आहे, काहीही कमी नाही. त्यांचं बरोबरच आहे. कमी काहीच नाही; पण तरीही मी आनंदी नाहीय. ‘पुष्कळ झालं,आता थांबूया’ असं मी अनेकदा ठरवतो; पण तसं होतच नाही.’

‘पूर्वी आमच्याकडं जुना लाकडी खोक्यातला टीव्ही होता. वाड्यातला पहिलाच टीव्ही. वाड्याच्या मालकांकडेसुद्धा तेव्हा टीव्ही नव्हता. आम्ही दोन खोल्यांमध्ये राहत होतो. टीव्ही बघायला नुसता धिंगाणा. किमान वीस-पंचवीस माणसं असायची. मग पंचवीस माणसांना चहा, चिवडा, पोहे, उपीट, चकल्या असलं काही ना काही तरी व्हायचंच. माझ्या आईचा जीव दमून जायचा. क्रिकेटची मॅच असली तर मग काय, विचारूच नका. मग तर सारखं चहाचं आधण ठेवलेलंच असायचं. मी लहान होतो रे तेव्हा. टीव्ही म्हणजे मोठ्ठं काही तरी श्रीमंतीचं लक्षण वाटायचं.’

‘आज माझा पाच खोल्यांचा फ्लॅट आहे. प्रत्येक खोलीत एक टीव्ही आहे. किचनमध्येसुद्धा; पण टीव्ही पाहायला माणसंच नाहीत. माझे वडील रिटायर झाले तेव्हा त्यांना फंडाचे पैसे मिळाले. दीड लाख रुपये. पंचवीस-तीस वर्षं नोकरी करून मिळाले किती? दीड लाख रुपये. आज माझा मोबाइल फोनच सव्वा लाख रुपयांचा आहे; पण कामाची माणसं सोडली तर कुणी फोनच करत नाही मला. कसलं स्वस्थचित्त अन् कसलं काय? पैसा असला की सगळं असतं, असं नाही बाबा.’ तो कळवळून म्हणाला. 

ज्याच्याकडं पैसा आहे, हाताखाली चार माणसं राबायला आहेत, घरात प्रत्येकाला स्वतंत्र चारचाकी गाडी आहे, अगदी आरामदायक सुखसुविधांनी भरलेलं घर आहे, त्यानं असं म्हणावं? मी विचारात पडलो. 

मी शाळेत शिकत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्या शाळेत एक मुलगा होता. चांगला क्रिकेट खेळायचा. श्रीमंत कुटुंबातला होता. त्याला घरून रोज शंभर रुपये मिळायचे; पण मधल्या सुट्टीसाठीचा डबा मिळायचा नाही. शाळेच्या परिसरात भैयाची भेळेची गाडी आणि शेड होती. तो तिथं भेळ, पाणीपुरी वगैरे खायचा. अगदी दररोज. आम्हाला तेव्हा त्याचा फार हेवा वाटायचा. रोज चमन भेळ, कचोरी, पावचटणी (तीही डबल), चटणीपुरी आणि वरून खच्चून पाणीपुरी खायला मिळणं, यासारखी चैन या जन्मात तरी दुसरी नाही, असं वाटायचं; पण माझ्या एका मित्रानं मला सांगितलं, की ‘तो रोज आमच्याकडे डबा मागतो आणि त्या डब्याच्या बदल्यात पैसे देतो. ज्या दिवशी डब्यात नावडती भाजी असेल, त्या दिवशी तो डबा त्याला द्यायचा. भाजी कुठलीही असो, तो आनंदानं घेतो आणि पंचवीस-तीस रुपये देतो. ते पैसे घ्यायचे आणि मस्त भेळ-पाणीपुरी, चटणीपुरी हाणायची. येडाय तो. घरच्या पोळीभाजीच्या बदल्यात भैयाची भेळ. असं कुठं असतंय का?’

तेव्हा या सगळ्याचं अप्रूप वाटत असलं, तरी त्याचा नेमका अर्थ तेव्हा कळत नव्हता. ज्या वेळी होस्टेलवर राहायला गेलो आणि डबा लावून जेवायला लागलो, तेव्हा त्या घरच्या डब्याचा खरा अर्थ कळला. रोज शंभराची नोट खर्चायला मिळणारा तो मुलगा प्रत्यक्षात किती गरीब आहे, हे फार नंतर समजलं.

शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक या सहा पैलूंमधली सुसंगती हरपली, की आपली स्वस्थचित्तता हरपणारच. एकाही ठिकाणचं पारडं रितं असू नये आणि ते प्रमाणाबाहेर जडही असून चालणार नाही. सहापैकी कुठलंही पारडं कुपोषित असेल तर दारिद्र्य येतं आणि अतिजड झालं की त्याची धुंदी चढते, कैफ चढतो. दारिद्र्य हा शब्द केवळ आर्थिक दृष्टीनं नव्हे तर व्यापक अर्थानं घ्यायला हवा. आणि तोच समतोल साधणं फार कठीण आहे. 

अनेकदा मला वाटतं, की आपण खूपशा अनावश्यक गोष्टींमध्ये भरमसाठ गुंतवणूक करतो. त्या गोष्टी फारशा वापरतही नाही; पण पैसे मात्र अडकून पडतात. आपण पैसे खर्च करण्यासाठी जी जी नवनवी निमित्तं शोधतो, त्यातली किती गरजेची असतात? अनावश्यक ठिकाणी खर्च होत राहिला, की आर्थिक स्वास्थ्य बिघडणारच. सामाजिक-सांस्कृतिक कारणांमध्ये यथाशक्ती योगदान दिलं नाही, तर तेही स्वास्थ्य बिघडतंच. स्वार्थ सोडून समाजात मिसळलो नाही, लोकांशी जोडले गेलो नाही तर भावनिक स्वास्थ्य बिघडतं. मग एकूण सहा स्वास्थ्यांपैकी दोनाहून अधिक गोष्टींमधलं स्वास्थ्य आपल्याकडं नसेल तर आपण निरोगी कसे? योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठी केलेली योग्य गुंतवणूक हे संतुलित स्वास्थ्याचं लक्षण आहे. मग ती गुंतवणूक जशी आर्थिक असते, तशीच ती ज्ञान, माहिती, शारीरिक आरोग्य, सांस्कृतिक संपन्नता, सामाजिक बांधिलकी यांतही केलीच पाहिजे. 

गुरुपुष्यामृताच्या दिवशी जशी सोन्याची खरेदी होते, तशी वाचन प्रेरणा दिनी पुस्तकांचीही खरेदी केली पाहिजे. दिवाळीच्या निमित्तानं नव्या कपड्यांची खरेदी होते, तशी पर्यावरण दिनाच्या दिवशी भारतीय झाडं लावून त्यांची निगुतीनं जोपासना केली पाहिजे. एवढं सामंजस्यसुद्धा आपल्याला भरपूर स्वस्थचित्तता देईल. आपल्या मुलीबरोबरच आणखी एका निर्धन कुटुंबातल्या मुलीसाठी सुकन्या ठेव योजनेत रक्कम ठेवत राहिलो, तर सामाजिक स्वास्थ्यासाठी बिल गेट्स फाउंडेशनच्या उपकारांची गरज आपल्याला पडणार नाही. शिवाय आपल्याला उत्तमासाठी काम केल्याचं समाधान मिळणार, ते वेगळंच. 

एवढ्या साध्या कृतीनंसुद्धा आपण स्वस्थचित्त होणार असू, तर मग आपण असे का वागत नाही? असं वागण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज आहे? कुणाच्या प्रेरणेची गरज आहे? या अगदी साध्या गोष्टी आहेत. स्वत:ला सुज्ञ समजणारा कुणीही माणूस या गोष्टी सहजच करू शकतो. उलटपक्षी ‘हे असलं काही मी करणार नाही’ असा विचार करणाऱ्या माणसांच्या वृत्तीविषयी शंका उत्पन्न होईल. स्वत:चं परखड परीक्षण करून आपल्या स्वस्थचित्ताच्या मार्गात आडव्या येणाऱ्या गोष्टी वेळीच उखडून टाकणं गरजेचं आहे. 

शिस्तयुक्त, पण साधी राहणी आणि एका प्रमाणाबाहेर स्वत:ला व्यग्र होऊ न देणं या दोन गोष्टी पाळायला सुरुवात केली तर आपला स्वस्थचित्त होण्याकडचा प्रवास सुरू होईल. गोष्ट कोणतीही असो, तिचा अतिरेक टाळणं आणि दैनंदिन जगण्यात पर्यावरणपूरकता आणणं हा त्याच प्रवासातला पुढचा टप्पा. या चार गोष्टी पाळणारी माणसं पाहा. ती कशी असतात, कशी दिसतात, कशी वागतात, कशी बोलतात, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया कशी देतात ते अगदी निरखून पाहा. स्वस्थचित्त असण्याच्या बाबतीत अशी माणसं आपल्यापेक्षा किती तरी पुढं आहेत, हे तुमच्याही लक्षात येईल. 

मन मानेल तसं वागणारी माणसं आणि जगण्या-वागण्यातली नियमांची चौकट पाळणारी माणसं यांच्यात प्रगती कुणाची होते, वागण्यातली सुसंगती कुणाकडे असते, जबाबदाऱ्यांना उत्तम न्याय कोण देऊ शकतो, याची उत्तरं शोधून पाहा. नक्की सापडतील. म्हणूनच, ‘स्वस्थचित्तता’ आपोआप येत नाही, ती नियमित प्रशिक्षणानंच येते आणि ती टिकवून ठेवण्याकरितासुद्धा नियमित प्रयत्न करत राहावे लागतात. गरजा जितक्या कमी, तितक्या विवंचनासुद्धा कमी आणि स्वास्थ्य मात्र उत्तम! 

वास्तविक, आपण पूर्वीपेक्षा किती तरी अधिक सुखासीन आणि आरामदायी आयुष्य जगतो आहोत. आपली अनेक कामं पटापट करण्यासाठी आपल्याकडं भरपूर यंत्रं आहेत. पूर्वीपेक्षा प्रवास वेगवान झाला आहे. घरं वातानुकूलित झाली आहेत. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी एका सेकंदात दृकश्राव्य संपर्क साधता यावा, एवढी संवाद साधण्याची यंत्रणा सक्षम आहे; पण मग तरीही माणसांच्या आयुष्यात अपूर्णत्व का आहे? मनं का जुळू शकत नाहीत? नाती दिवसेंदिवस अधिकाधिक तकलादू का होत चालली आहेत? पूर्वी एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं आर्थिक ताणामुळं आत्महत्या करत नव्हती, आज ते प्रमाण का वाढलंय? माणसं टोकाचा नकारात्मक विचार का करायला लागली आहेत? त्यांना सारखं नैराश्य का येतं? कारण एकच आहे - ‘स्वस्थचित्त’ नसणं. 

आपण जितकं प्रचंड मिळवू, तेवढे सुखी असू, असं माणसांना वाटतं; पण तसं घडत नाही. ‘श्रीमंतीतच सुख असतं’ ही संकल्पना आपलं स्वास्थ्य मारून टाकत चालली आहे. आपल्या स्वास्थ्याचा श्वास आपणच आपल्या हातांनी कोंडतो आहोत. हे चुकत चाललेलं गणित सुधारण्यावाचून आपल्याकडे दुसरा पर्याय कुठं आहे? 

अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपल्याला बरंच महत्त्वाचं शिकवून जातात. कोऱ्या कागदांचं उदाहरण पहा. नुसते एकावर एक असे सुटे रचून ठेवले तर वाऱ्याच्या साध्या झोतानंसुद्धा सैरावैरा उडायला लागतात; पण वहीत बांधलेल्या कागदाचं तसं होत नाही. तो पक्का बांधलेला असतो, त्याला पुठ्ठ्याचं संरक्षण असतं. तो टिकून राहतो. त्या कागदावर लिहिलेला मजकूरसुद्धा सुरक्षित राहतो, वेळेला बरोबर सापडतो; पण जेव्हा कागदाला वहीच्या रूपात बांधून घेणं म्हणजे पारतंत्र्य वाटायला लागतं, तेव्हा प्रश्न सुरू होतो. ‘कुठलंच बंधन नको’ असं वाटणं आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी चांगलं नाही. जेव्हा कागद सुटे असतात आणि ते वाऱ्यानं उडून जाण्याचा धोका निर्माण होतो, तेव्हा दुसरा काही पर्याय राहत नाही आणि कागदांच्या उरावर जाडजूड पेपरवेट ठेवावा लागतो. आपण वहीच्या बंधनात सुरक्षित राहायचं की सुटं राहून डोक्यावर पेपरवेट ठेवून घ्यायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न!

- मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काउन्सेलिंग सेंटर, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BVLTCT
Similar Posts
लॉकडाउन : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - भाग ७ : डॉ. आनंद नाडकर्णी यांची विशेष मालिका (ऑडिओ) लॉकडाउनच्या अभूतपूर्व स्थितीमुळे देशभरातल्या बहुतांश नागरिकांना अचानक मोकळा वेळ मिळाला. यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात, मनात जे काही घडतं आहे, त्याचा वेध घेणारी विशेष ऑडिओ मालिका ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सुरू केली आहे. करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस असे त्या मालिकेचे नाव... या मालिकेचा हा सातवा भाग
लॉकडाउन : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - भाग ११ : डॉ. आनंद नाडकर्णी यांची विशेष मालिका (ऑडिओ) लॉकडाउनच्या अभूतपूर्व स्थितीमुळे देशभरातल्या बहुतांश नागरिकांना अचानक मोकळा वेळ मिळाला. यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात, मनात जे काही घडतं आहे, त्याचा वेध घेणारी विशेष ऑडिओ मालिका ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सुरू केली आहे. करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस असे त्या मालिकेचे नाव... या मालिकेचा हा अकरावा भाग
लॉकडाउन : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - भाग १४ : डॉ. आनंद नाडकर्णी यांची विशेष मालिका (ऑडिओ) लॉकडाउनच्या अभूतपूर्व स्थितीमुळे देशभरातल्या बहुतांश नागरिकांना अचानक मोकळा वेळ मिळाला. यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात, मनात जे काही घडतं आहे, त्याचा वेध घेणारी विशेष ऑडिओ मालिका ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सुरू केली आहे. करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस असे त्या मालिकेचे नाव... या मालिकेचा हा १४वा भाग
लॉकडाउन : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - भाग १० : डॉ. आनंद नाडकर्णी यांची विशेष मालिका (ऑडिओ) लॉकडाउनच्या अभूतपूर्व स्थितीमुळे देशभरातल्या बहुतांश नागरिकांना अचानक मोकळा वेळ मिळाला. यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात, मनात जे काही घडतं आहे, त्याचा वेध घेणारी विशेष ऑडिओ मालिका ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सुरू केली आहे. करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस असे त्या मालिकेचे नाव... या मालिकेचा हा दहावा भाग

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language